बडीशेप

बडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोडय़ांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप गोड चवीची असते. बडीशेप रुचकर आहे. तोंडाला स्वाद आणते.

जेवणानंतर नुसती चिमूटभर बडीशेप खाल्लेले अन्न पचवू लागते. कितीही जडान्न खाल्ले असले तरी ते पचविण्याचे सामथ्र्य बडीशेपेत आहे. बडीशेप दोन प्रकारे काम करते. पोटात वायू धरू देत नाही. तसेच आमांश किंवा चिकटपणा दूर करते. जेवणानंतर विडय़ाबरोबर किंवा नुसती बडीशेप खाण्याचा प्रघात हा अतिशय चांगला आहे.

कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे यांसारख्या अपचनाच्या सर्व तक्रारींत बडीशेप, बडीशेपेचा काढा किंवा अर्क उत्तम काम करतो.

काहींना सोनामुखी, एरंडेल किंवा जुलाबाची स्ट्राँग औषधे घेण्याची सवय असते. ही औषधे घेतली की पोटात कळ येऊन पोट दुखू लागते. अशा वेळी बडीशेप व चिमूटभर सुंठ घेतले की लगेच आराम पडतो. थोडक्यात, जिभेपासून पक्वाशयापर्यंतच्या अन्नवह महास्रोतसांचे आरोग्य राखण्याचे कार्य बडीशेपेसारखी लहान वस्तू करू शकते. पोट दुखून जुलाब होत असल्यास बडीशेप व खसखशीचा काढा प्यावा. जुलाब थांबतात.

लहान बालकांना दात येताना जुलाबाचा त्रास होतो. त्याकरिता त्यांना चुन्याच्या निवळीबरोबर बडीशेप चूर्ण द्यावे.
मानसविकारात, बुद्धिमांद्य, फिट्स येणे, उन्माद या तक्रारींकरिता बडीशेप काही प्रमाणात उपयोगी पडते. बडीशेप ही वीर्यवृद्धी करते, जिभेचा चिकटा दूर करते. त्यामुळे बुद्धी ज्यांना नेहमी तरतरीत ठेवायची आहे त्यांनी बडीशेप खावी. फिट्स विकारात गार्डिनाल, डिलान्टिन, मेझाटोल अशा नाना औषधांची जन्मभर सवय लागून माणसाचा मेंदू काम करेनासा होतो तेव्हा बडीशेप चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. स्मरणशक्ती सुधारते.

तापामध्ये शोष पडतो. अंगाची लाही लाही होते. आग आग होते. अशा वेळेस बडीशेपेचे उकळलेले पाणी खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे. उन्हाळय़ातील उलटय़ा, तोंडाला पाणी सुटणे, मळमळणे, छातीतील जळजळ या तक्रारींकरिता बडीशेपेचा काढा थोडा थोडा घ्यावा. पोटात अन्न कुजत असेल तर निरनिराळे क्षार, पादेलोण, शिरका, व्हिनेगर अशा औषधांची सवय लागलेल्यांनी थोडी बडीशेप खावी. आतडय़ांची हानी टळते.

Leave a Reply