हगवण लागणे

जुलाब-हगवण-अतिसार हा मुलांचा नंबर एकचा शत्रू आहे. लहान मुलांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुलाब-अतिसार या आजारांचे सगळयात वर नाव येते. जुलाब-अतिसारांमुळे मृत्यू होतातच, पण वाचलेल्या मुलांच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. (कुपोषण, वाढ खुंटणे, इ.)
सर्वसाधारणपणे चांगले पोषण आणि स्वच्छ पाणीपुरवठा या दोन गोष्टींमुळे समाजातले जुलाब-अतिसाराचे प्रमाण खूपच कमी होईल.
अतिसाराच्या आजारांमध्ये योग्य उपाययोजना केली तर कुपोषणासारखे परिणाम आणि मृत्यू मोठया प्रमाणावर टाळता येतील. जुलाब, अतिसार पूर्ण टाळता नाही आले तरी त्यामुळे होणारा शोष टाळता येतो हे निश्चित. कुपोषणही अटळ नाही. अतिसाराची कारणे नीट समजावून घेऊन योग्य उपाययोजना गावपातळीवरही करता येते. गेल्या काही वर्षात यामुळे या आजाराने फार मृत्यू होत नाहीत.
हगवणीच्या रोगप्रक्रियेतला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शोष. शरीरातून जुलाब-उलटयांद्वारे पाणी बाहेर जाऊन शरीरात कोरडेपणा व शोष निर्माण होणे. असंख्य लहान मुले या कारणानेच दगावतात. शोष पडल्याने शरीरातील पेशी कोरडया पडतात. शोष पडल्याने रक्ताभिसरण मंदावते कारण रक्तातील पाणी कमी होऊन रक्ताचा पातळपणा कमी होतो. रक्तातील पाणी कमी झाल्याने शरीरातील अनेक संस्थांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. यामुळे रक्ताभिसरणसंस्थेत फिरवण्यासाठी आवश्यक असलेले रक्ताचे माप कमी पडते. आहे तेवढया रक्ताने कामकाज चालवण्यासाठी हृदय वेगाने काम करते. यामुळे नाडी वेगाने चालते. पण फार वेळ अशी स्थिती राहिल्यास प्रमाणाबाहेर शोष पडून मेंदूला रक्तपुरवठा पुरेनासा होतो. यामुळे बेशुध्दी व त्यानंतर मृत्यू येतो.
मूत्रपिंडातून मूत्र तयार होण्याचे काम मंदावते व कालांतराने बंद पडते. यामुळे मूत्रपिंडे बिघडू शकतात.
लक्षणे:
- त्वचा कोरडी शुष्क होते (त्यामुळे चिमटीतून सोडलेली त्वचेची सुरकुती-घडी बराच काळ तशीच राहते).
- जीभ कोरडी दिसते, तहान लागते.
- डोळे/टाळू खोल जातात.
उपाय:
लहान मुलांना हगवण लागल्यास त्यांचे स्तनपान बंद करू नये. सारखी शी लागल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. बाल अशक्त असेल तर आजार गंभीर होण्याची शक्यता असते. अशा वेळी एक ग्लास शुद्ध पाण्यात एक चिमुट मीठ व एक चमचा साखर कालवून हे मिश्रण २-२ चमचे सारखे पाजत राहावे. त्यामुळे शरीरातील पाण्याचा अभाव दूर होतो. जर लवकर दश सुधारत नसेल तर डॉक्टर ला लगेच दाखवावे.