मिरची : खावी न खावी

मीठ-मिरची या जोडशब्दांनी आपल्याला रोजच्या व्यवहारात इतकी सवय झाली आहे की, स्वयंपाकघरात त्याशिवाय आपले काहीच चालत नाही. क्वचित काही प्रांतांत किंवा काही प्रदेशांत स्वयंपाकात मिरचीऐवजी मिरी वापरतात. पण मिरची नाही असा स्वयंपाक सहसा होत नाही.

दक्षिण भारतात विशेषत: आंध्र प्रदेशात मिरचीचा वापर फार. मिरचीमुळे भोजनास चव येते, स्वादिष्ट होते, तोंड स्वच्छ राहते, भूक राहते, लागते. मिरची आपल्या तीक्ष्ण, उष्ण व पित्तवर्धक गुणांमुळे रक्तवर्धक आहे. काही प्रमाणात कफ, आमांश, कृमी आमांशाची पोटदुखी, उदरवात या विकारांत उपयोग होतो. कॉलरा विकारात माफक प्रमाणातच खाल्ल्यास उपयोग होतो.

सुकलेली मिरची वातनाशक आहे. ज्याचे शरीर गार पडते, ज्यांना उष्णतेचा किंवा रक्त पडण्याचा काही त्रास नाही त्यांना सर्दी झाली असल्यास मिरचीच्या बियांच्या चूर्णाचा उपयोग होईल. सर्दी, कफ यामुळे ज्यांना पोटाचा त्रास आहे, पोट दुखते, त्यांनी मिरचीच्या बियांचे उकळलेले गरम पाणी किंवा मिरच्यांचा अर्क घ्यावा. ज्यांना उष्ण पदार्थ चालत नाहीत त्यांनी हा प्रयोग करू नये. भाजलेल्या जागेवर तिखटाचे चूर्ण व गोडेतेल असे मिश्रण लावावे. त्वचा लवकर भरून येते. त्वचेत जखम होत नाही.

काहींना खूप मिरच्या खायची सवय असते. ती सवय सोडण्याकरिता मिरच्यांचा वापर चढउतार पद्धतीने म्हणजे तीन, चार, दोन, अडीच, दीड, दोन, एक, दीड, अर्धी अशा पद्धतीने करावा. पंधरा दिवसांत मिरची जास्त खाण्याची सवय सुटते.
मिरच्यांमधील बी हे शरीराचा दाह करणारे आहे. मिरच्यांचे बी काढून टाकावे. नुसत्या टरफलांचे चूर्ण करावे. हे चूर्ण कॉलरा, हगवण, आमांश या पोटाच्या तक्रारींत विविध अनुपानाबरोबर वापरावे. कांदा रस, हिंग, कापूर, डाळिंबाचे दाणे, चिंच, गूळ, आले, जिरे, पुदिना, लिंबू अशा विविध पदार्थाबरोबर आवडीनुसार मिरची चूर्ण वापरता येते. पूर्णपणे बंद झालेला अग्नी मिरचीच्या माफक वापराने पूर्ववत कामात आणता येतो. मिरच्यांमध्ये काही जीवनसत्त्वे आहेत. त्यामुळे त्वचेत किडा-मुंगी किंवा कुत्रा, कोळी यांची विषबाधा झाली तर जखमेत मिरची बी चूर्ण भरून लावावे. विषबाधा होत नाही. दारुडय़ा माणसाला भूक लागत नसल्यास मिरचीच्या तिखटाचा उपयोग होतो. मिरचीने पोटात आग पडत असल्यास मिरचीच्या तिखटाबरोबर थोडा चुना मिसळावा.

मिरचीने जेवढे रोग बरे होऊ शकतील त्यापेक्षा अनेकपट रोग मिरचीच्या कमी-अधिक वापराने होतात. असलेले रोग वाढतात. वाढलेले रोग बळावतात. मिरची तीक्ष्ण, उष्ण व अतिशय रूक्ष आहे. रक्तातील दाहकता मिरचीच्या वापराने वाढते. त्यामुळे रसधातूंतील स्निग्धपणा, सौम्यपणा, मिरचीच्या अधिक वापराने नाहीसा होतो. शरीरातील मृदू, कोमल, सौम्य अवयवांचा नाश मिरचीमुळे होतो. केस, डोळे, नाक, ओठ, जीभ, घसा, गळा, सर्व आशय उदाहरणार्थ अमाशय, ग्रहणी, लहान व मोठे आतडे, गर्भाशय, स्तन, किडनी, मूत्रेंद्रिय, त्वचा, गुद इत्यादी अवयवांचे स्वास्थ्य मिरचीच्या कमी-अधिक वापराने बिघडते.

अजीर्ण, आम्लपित्त, अल्सर, अॅलर्जी, डोळे, त्वचा, मूत्रेंद्रिय, गुद यांची आग होते. पोटात आग पडणे, आमांश, अंग बाहेर येणे, रक्तप्रदर, अत्यार्तव, उलटय़ा, कंडू, सांधेदुखी, कंबर, गुडघे व पाठदुखी, कान वाहणे, कावीळ, केस गळणे, पिकणे, कृशता, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, गांधी उठणे, डोळय़ांची लाली, तोंड येणे, त्वचाविकार, दंतविकार, नागीण, अनिद्रा, पांडू, भगंदर, मूळव्याध, पोटदुखी, फिटस् येणे, रक्तक्षय, मुखरोग, हाडांचे विकार इत्यादी विकारांत मिरची चूर्ण वज्र्य करावे. तिखटपणा व पचनाकरिता आले किंवा मिरी यांचा वापर करावा. ज्यांना जेवणात तिखट हवे पण मिरचीचे दोष नकोत त्यांनी ढोबळी मिरची वापरून पाहावी.

Leave a Reply