रंग खेळा पण जपून ….

होळीचे रंग

पाणीटंचाई लक्षात घेता, यंदाची होळी पाण्याविना साजरी करण्याचा संकल्प करायला हवा. कोरडे रंग वापरून होळी खेळली तरी रंगांमधल्या रसायनांमुळे ते रंग काढताना भरपूर पाणी वापरावं लागतं. त्याऐवजी कोरडे रंग आणि तेही नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले वापरले तर पर्यावरणपूरक ठरेल. कृत्रिम रंग तुमच्या त्वचेलाही हानी पोहोचवू शकतात. या कृत्रिम रंगांना पर्याय म्हणून घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करता येतील. घरचा वैदू कडून खास टिप्स

 • लाल रंग तयार करण्यासाठी रक्तचंदनाचा वापर करावा. रक्तचंदन औषधी असतं आणि याचा वापर फेसपॅक तयार करण्याकरिता होतो. त्यामुळे यापासून बनवलेला रंग फायदेशीर त्वचेसाठी उपयुक्तच ठरेल. रक्तचंदनाचं खोड उगाळून त्यापासून हा रंग मिळू शकतो. लाल जास्वंद किंवा गुलाबाच्या पाकळ्या वाटूनही लाल रंग तयार करता येईल.
 • पिवळा रंग करण्यासाठी हळदीचा वापर करता येईल. सुगंधी अशी कस्तुरी हळदही वापरू शकता किंवा मग झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या घ्या, त्या वाळवा आणि दळून घेऊन हर्बल पेस्ट तयार करा. केशरी रंगासाठी आपण पळसाच्या फुलांच्या पाकळ्या वापरू शकतो.
 • गर्द जांभळ्या रंगासाठी बीटाचा रस वापरावा आणि हवे असल्यास त्यात पाणी घालावे.
 • काळ्या रंगासाठी काळी द्राक्षे ग्राइंडरमध्ये वाटून घ्या आणि त्यात पाणी मिसळण्यापूर्वी त्याचा लगदा बाजूला काढून घ्या. आणखी एक पर्याय असा – एक स्टीलची स्वच्छ वाटी घेऊन आतील भागास मोहरीचं तेल लावा. एक मेणबत्ती लावून ज्योतीच्या काजळीवर स्टीलची वाटी (तेलाची बाजू) रात्रभर ठेवा . दुसऱ्या दिवशी सकाळी काळा रंग तयार होईल.

रंग खेळायला जाण्यापूर्वी:

कोरडे रंग किंवा गुलाल यांची निर्मिती नैसर्गिकरीत्या न करता कृत्रिम रसायनापासून केलेली असते. त्यामुळे केवळ त्वचेला त्रास होतो असं नाही, तर केसांच्या मुळाशीदेखील हा रंग साचून राहण्याची शक्यता आहे. सुरक्षित, आरोग्यदायी  आणि संस्मरणीय होळी खेळण्यासाठी काही टिप्स :

 • चेहरा आणि शरीराला ऑलिव्ह तेल, खोबरेल तेल, बदाम तेल किंवा मोहरी तेल विपुल प्रमाणात लावा.
 •  केसांना नारळ, ऑलिव्ह किंवा एरंडेल तेल मुळापासून लावून चांगलं मालिश करा, जेणेकरून केस कोरडे होणार नाहीत व घातक रसायने, धूळ यापासून बचाव होईल.
 •  तुम्ही जरी सेंद्रिय रंगांचा वापर करत असाल तरी तो प्रमाणाबाहेर वापरला जाणार नाही याची खात्री करा, कारण हळद किंवा चंदनासारखा विशिष्ट घटक खूप प्रमाणात लावल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो. यामुळे रॅशेस, पुरळ येण्याची शक्यता असते.
 •  आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे लक्षात घेऊन रंग तयार करताना साहित्याची निवड करा, कारण चंदन तेलकट त्वचेला उत्तम, पण कोरडय़ा त्वचेला त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते.

रंग खेळल्यानंतर:

 • रंग काढण्यासाठी साबणाचा वापर करू नका. तसेच साबणाने चेहरा धुऊ नका, कारण साबण अल्कधर्मी असतो. त्यामुळे पुढे त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. त्याऐवजी शुद्ध मलई किंवा लोशन वापरा. त्वचेवर मालिश करून मग ओलसर कापसाच्या बोळ्याने ते पुसा.
 •  तिळाच्या तेलाने मसाज करूनदेखील शरीर आणि चेहऱ्याचा रंग काढण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. हे तेल रंग काढण्यासाठी मदत करते, त्यासोबत त्वचेला अतिरिक्त पोषणदेखील देते.
 •  केस धुताना, प्रथम साध्या पाण्याने धुऊन घ्या, जेणेकरून कोरडे रंग आणि लहान कण धुऊन निघतील. केस सौम्य नैसर्गिक शाम्पू लावून धुवा, जेणेकरून केसांना कोणतीही हानी पोहोचणार नाही.
 •  लिंबाचा रस आणि पाणी याचा वापर करून तुम्ही केस स्वच्छ धुऊ शकता. हे केसांच्या मुळाशी, टाळूच्या भागाला आम्ल-अल्कधर्मी गुणधर्माचा समतोल करण्यासाठी मदत करते.
 •  मेथीदाणे, आवळा पावडर, शिकेकाई पावडर आणि पाणी यापासून हेअर पॅक तयार करू शकतो. तसेच केस रंगवण्यासाठी असलेली मेंदी पावडर, चार चमचे लिंबाचा रस आणि दही यांचे एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांवर लावा आणि एक तासानंतर धुवा.

Leave a Reply