कावीळ

पावसाळा सुरू झाल्यावर किंवा पावसाळा संपल्यानंतर काविळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. काविळ आणि काविळीवरील उपचारांबाबत अनेक समज-गैरसमज असले तरी दूषित पाण्यामुळे तसेच दूषित अन्न सेवनामुळे काविळ होते. काविळ होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय, आहार-विहाराबाबत तसेच काविळ झाल्यानंतर करावयाच्या उपचाराबाबत आयुर्वेदात खूप सोपे आणि चांगले उपाय सांगितले आहेत.
मुळात यकृतातील पेशींना इजा झाल्यानं त्यांना सूज येते आणि यकृताच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी रक्तातील पित्तयुक्त द्रव्याचे प्रमाण वाढते. हे वाढलेलं पित्तयुक्त द्रव्य डोळ्यांतील बुबुळ वगळता असलेला पाढंरा भाग, त्वचा तसेच हातापायाची नखे अशा भागांतं साचून राहतं. त्यामुळे शरीराला एकप्रकारचा पिवळेपणा येतो. मूत्राद्वारेही या पित्तयुक्त द्रव्याचा निचरा होत असल्याने लघवी पिवळी होते. पित्तयुक्त द्रव्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर लघवीला कित्येकदा लालसर रंग येतो. यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यानं तसेच रक्त आणि मूत्रात पित्तजन्य पेशींचं प्रमाण वाढल्यानं पचनाच्या तक्रारींत वाढ होते. लाल रक्तपेशींचा वेगाने नाश होऊन बिलिरुबीन वाढणं (लहान बाळांना जन्मत: होणारी कावीळ). पित्तमार्गातील अडथळ्यामुळे यकृतातपित्त साठून ते रक्तात उतरणं म्हणजेच काविळ होय.
लक्षणे :-
- काविळ झाल्यावर अन्न पचनाच्या तक्रारी वाढल्यानं कित्येकदा व्यक्तीला उलट्या होतात आणि परिणामी अशक्तपणा वाढतो. त्यामुळे चक्कर येण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते.
- हातापायाचे गोळे दुखण्याच्या तक्रारी उद्भवतात.
- काविळ झालेल्या व्यक्तीला सारखं झोपावसं वाटतं.
- चेहरा आणि संपूर्ण शरीर निस्तेज होतं.
- भूक मंदावते आणि अन्न पाण्यावरची इच्छा नाहिशी होते.
- सतत ताप येणं, डोकेदुखी, अंगदुखी, भूक नसणं,मळमळणं ही अगदी प्राथमिक लक्षणं आहेत.
काळजी कशी घ्याल :-
- काविळ हा आजार बरा होण्यासाठी जशी औषधोपचारांची गरज असते तशीच पथ्यपालनाचीही नितांत गरज असते. काविळ झालेल्या रुग्णाची सुमारे पंधरा दिवस ते महिनाभर काळजी घेणं गरजेचं असतं.
- सुमारे महिनाभर पूर्ण आराम करावा, मात्र जास्त झोपू नये.
- उन्हात फिरणं टाळावं.
- काविळ झालेल्या व्यक्तीनं काजू, बदाम, खोबरे, तळलेले तसेच मसालेदार तिखट पदार्थ त्याचप्रमाणे पचायला जड पदार्थ वर्ज्य करावेत.
- उघड्यावरचं अन्न खाणंही कटाक्षानं टाळावं.
- दूध आणि दुधाचे पदार्थ तसेच मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णासारखे उपाय करावेत.
- मद्यपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन पूर्णत: टाळावं.
- पाणी उकळून थंड करूनच प्यावं.
घरगुती उपचार :-
- मुळ्याचा पानांचा रस १०० ग्राम , २० ग्राम साखरेत मिसळून सकाळी १५-२० दिवसापर्यंत प्यावा. आंबट खाऊ नये.
- वाटण्या एवढी तुरटी आचेवर शेकून फुगवून घ्यावी व वाटून चूर्ण करावे. एक पिकलेले केळे मधून कापून दोन फोडी कराव्या . यावर चूर्ण शिंपडून फोडी आपसात पुन्हा जोडून सकाळी रिकाम्या पोटी खावे . सात दिवस असे केळे रोज खाल्याने कावीळ बरी होते.
- काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत.
- लाह्या, उकडलेल्या ताज्या भाज्या, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, मुगाची आमटी तसेच पालक-टोमॅटो-दुधी-कोबीचं कोमठ सूप, भाताची पेज, मध्यम पिकलेल्या केळी यासारखे पदार्थ द्यावेत. त्याचप्रमाणे ऊस चाऊन खावा.
- गोड आणि ताजे ताक दिवसातून किमान दोन वेळा प्यावं. गूळ पाण्यात उकळून गाळून त्याचा काढाही दिवसातून एकदा घ्यावा.
- अधमुरे दही घुसळून त्यातील लोणी काढून टाकून ताक करावे. या ताकात जिरे, धन्याची पूड, हिंग आणि सैंधव किंवा शेंदेलोण समप्रमाणात घालावे. १ ग्लास ताकात १/२ चमचा हे मिश्रण घालून ताक प्यावे.
कावीळ रोखण्यासाठी :-
- स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा
- शिजवलेले ताजे अन्न खा
- पाण्याच्या स्वच्छतेबाबत शंका असल्यास उकळलेले पाणी किंवा बाटलीबंद पाणी प्या
- कच्च्या भाज्या धुतलेल्या व व्यवस्थित स्वच्छ केल्या असतील तरच कच्च्या खा
- हिपॅटायटिसची साथ असलेल्या भागात जाणार असाल तर ‘हिपॅटायटिस ए’ची लस घ्या
- आपण जर रोगवाहक असल्यास आपल्या जोडीदाराला त्याची माहिती द्या
- टूथब्रथ, रेझर किंवा मॅनिक्युअरची साधने सामूहिक पद्धतीने वापरू नका
- मद्यपान पूर्णपणे टाळा